मुंबई, २०२६: संत झेवियर महाविद्यालय ‘मल्हार २०२६’ च्या पूर्व-कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘इंडियन परफॉर्मिंग आर्ट्स’ (IPA) विभागाने ‘जिंदगी दो पल की’ हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. संगीत, नृत्य आणि कथाकथनाच्या माध्यमातून जीवनाचे सौंदर्य, अनिश्चितता आणि प्रत्येक क्षणाचे महत्त्व या कार्यक्रमातून प्रभावीपणे मांडण्यात आले.
कार्यक्रमात अदितीच्या बालपणापासून प्रौढत्वापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला. सुरुवातीला प्रेक्षकांशी संवाद साधत, “तुमच्याकडे किती क्षण आहेत यापेक्षा, ते क्षण तुम्ही कसे जगता हे महत्त्वाचे आहे,” हा मुख्य संदेश देण्यात आला.
कौटुंबिक नातेसंबंध, मैत्री, पहिले प्रेम, प्रेमभंग, स्वतःची ओळख आणि कृतज्ञता अशा विविध अनुभवांतून अदितीचा भावनिक प्रवास उलगडत गेला. तिच्या आयुष्यातील प्रसंगांमुळे प्रेक्षकांनाही स्वतःच्या आठवणी आणि अनुभवांची आठवण झाली.

IPA विभागाने प्रभावी अभिनय, विचारपूर्वक निवडलेले संगीत आणि भावपूर्ण नृत्यदिग्दर्शन यामुळे कथा जिवंत झाली. तबला, पियानो आणि गिटारच्या साथीने सादर करण्यात आलेल्या थेट गायनाने प्रत्येक प्रसंग अधिक प्रभावी आणि भावनिक बनवला.
अदिती आणि तिच्या वडिलांचे नाते, मैत्रीतील हलकेफुलके क्षण आणि पहिल्या प्रेमाचा अनुभव अशा प्रत्येक टप्प्याने प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवले.
दैनंदिन धावपळीत वर्तमानातील प्रत्येक क्षण जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. सादरीकरणे, कामाचे कॉल्स आणि डेडलाईन्स पुन्हा येतील, पण प्रत्येक क्षण हा अनमोल आणि पुन्हा न मिळणारा असतो, याची जाणीव या कार्यक्रमाने करून दिली.
हृदयस्पर्शी संदेश, दमदार सादरीकरण आणि संगीतमय कथाकथनामुळे ‘जिंदगी दो पल की’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनात कायमची छाप सोडली.
